Saturday, January 16, 2010
Artical on Loksatta
आरोग्यम् ग्रंथसंपदा!
आजार झाल्यानंतर त्याविषयी माहिती घेण्यापेक्षा आपल्या आरोग्याविषयी अधिक वाचन करत आपण सुरुवातीपासूनच जागरुक राहिलो तर आपण नक्किच निरोगी राहू. यासाठी खास ‘हेल्थ लायब्ररी’ सुरू करण्यात आली आहे.
आपले आरोग्य चांगले राखणे हे आपल्या प्रत्येकाच्याच हातात असते. सध्याच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक जीवशैलीत आरोग्यासारख्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नसतो. धावपळीचे जीवन, सततचा ताण-तणाव, वेळी-अवेळी खाणे यातून आपल्याला कधी ना कधी किरकोळ आजारांना सामारे जावे लागते. अशा किरकोळ आजारांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा ते अंगावर काढतो. त्यातूनच मग अनेकदा साधे वाटणारे आजार गंभीर स्वरुप धारण करतात. एखादे दुखणे गळ्यापर्यंत आले की मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो. आपल्याला झालेल्या आजाराविषयीची माहिती घ्यायला सुरुवात करतो. पण असा एखादा आजार झाल्यानंतर त्याविषयी माहिती घेण्यापेक्षा आपल्या आरोग्याविषयी आपण सुरुवातीपासुनच जागरुक राहिलो आणि आजार होणार नाहीत, त्याची काळजी घेतली तर ते केव्हाही चांगले.
सध्या इंटरनेट, दूरचित्रवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला आरोग्यविषयक विविध माहिती सहज उपलब्ध होत आहे. मात्र त्यालाही काही मर्यादा आहेत. अशा वेळी आरोग्यविषयक पुस्तके, मासिके, सीडीद्वारे आरोग्यविषयक खूप माहिती आपल्याला मिळू शकते. आरोग्यविषयक पुस्तकांचा खजिना असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करणारे एक ग्रंथालय मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. डॉ. अनिरुद्ध आणि डॉ. अंजली मालपाणी यांनी हे ग्रंथालय 13 वर्षांपूर्वी सुरु केले. काही वर्षांपूर्वी केम्स कॉर्नर येथे असलेले हे ग्रंथालय गेल्या चार वर्षांपासून तळमजला, नॅशनल इन्शुरन्स बिल्िंडग, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, एक्सलसिअर चित्रपटगृहाजवळ
(छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून चालत हुतात्मा चौकाकडे निघाले की सुविधा हॉटेलच्या जवळ) फोर्ट येथे येथे आहे. या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ म्हणजे आरोग्यविषयक पुस्तके, मासिके आणि सीडीज्चा खजिना येथे उपलब्ध आहे. आरोग्यविषयक आस्था असलेली मंडळी किंवा एखाद्या आजाराबाबत माहिती घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना या पुस्तकांचा येथे मोफत लाभ घेता येऊ शकतो. या ठिकाणी दररोज तज्ज्ञ डॉक्टरांचीही व्याख्याने होत असतात, ती ही सर्वासाठी मोफत असतात.
ग्रंथालयाच्या व्यवस्थापक एव्हलिन या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहावे आणि त्यांना सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे ग्रंथालय मालपाणी दाम्पत्याने सुरु केले. सध्या हेल्थ एज्युकेशन लायब्ररी फॉर पिपल या स्वयंसेवी संस्थेकडून याचे व्यवस्थापन पाहिले जाते. इंग्रजी, हिंदूी या भाषांसह मराठी भाषेतील दहा हजारांहून अधिक पुस्तके आमच्याकडे आहेत. तसेच आमचे संकेतस्थळही असून एका ब्लॉगच्या माध्यमातूनही आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आमच्या येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांची दररोज व्याख्याने होत असतात. त्याचे ध्वनिचित्रमुद्रण आम्ही करतो. त्या व्याख्यानांच्या सीडीज् येथे पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पुस्तकांबरोबरच आमच्याकडे स्वतंत्र ऑडिओ व व्हिडिओ कक्ष असून त्याचाही लाभ लोकांना घेता येऊ शकतो.
येथील ग्रंथपाल तुषार झिंगडे यांनी सांगितले की, ग्रंथालयात येणाऱ्या लोकांना नेमक्या एखाद्या आजाराविषयी माहिती किंवा पुस्तके हवी असतील तर त्यांना ती पुस्तके सहज मिळतील, अशा प्रकारे ती ठेवण्यात आली आहेत. विविध आजार आणि त्यावरील पुस्तकांना काही संकेतांक देण्यात आले असून ते सर्वाना दिसतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही आजारावरील एखादे पुस्तक सहज मिळू शकते. ताण-तणाव, गर्भारपण, कर्करोग, मानसिक स्वास्थ्य, मधुमेह, हृदयविकार, लहानमुलांचे आजार, त्वचाविकार आणि अशा विविध विषयांचे वर्गीकरण येथे करण्यात आले आहे.
आमचे www.healthlibrary.com असे संकेतस्थळ असून त्यावरही विविध माहिती देण्यात आली आहे. तसेच www.helplibrary.blogspot.com असा इंग्रजीमधील आमचा ब्लॉगही असल्याची माहिती एव्हलिन आणि तुषार यांनी दिली.
सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी या ग्रंथालयाची वेळ असून रविवार सोडून सोमवार ते शनिवार या दिवशी हे ग्रंथालय सुरु असते.
अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी
०२२-६५९५२३९३/६५९५२३९४/२२०६११०१
ई-मेल
helplibrary@gmail.com
mailto: helplibrary@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment